#Social
ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन….!
बीड दि.३ – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळावे संपन्न होत आहेत. आणि त्याच अनुषंगाने बीड येथेही ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
येत्या १३ तारखेला ४ वाजता बीड येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक छगनरावजी भुजबळ आणि प्रमुख ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बीड येथे मेळावा संपन्न होणार आहे. ओबीसी, भटके विमुक्त आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये यासाठी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. आणि महाराष्ट्रातील लाखो समाज बांधव या मेळाव्यासाठी उपस्थिती लावत आहेत. बीड येथे होणाऱ्या मेळाव्यालाही संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो ओबीसी समाज बांधव उपस्थिती लावणार आहेत. आणि याची तयारी म्हणून समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुभाष राऊत हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी केज तालुक्यातूनही संपूर्ण समाज बांधव बीड येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्यासाठी दिनांक ३ जानेवारी रोजी ऍड. सुभाष राऊत यांनी केज येथे एक बैठक घेतली. यावेळी ओबीसी समाजातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधवांनी बीड येथे मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आणि ओबीसींना जे आरक्षण आहे त्याचा बचाव करण्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी आता पुढे येण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भव्य दिव्य अशा या मेळाव्याचे नियोजन हे सकल ओबीसी बांधव समाज करत असून यावेळी ओबीसी, भटके विमुक्त समाजातील संपूर्ण घटकांची उपस्थिती राहणार असल्याचा विश्वास यावेळी ऍड. राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील ओबीसी समाजातील प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.