संपादकीय
कुठे कांही अनुचित प्रकार होत असतील तर तात्काळ पोलिसांना माहिती द्या….!
केज दि.४ – शहरात व परिसरात शांतता ठेवण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नसून नागरिकांचीही आहे. त्यामुळे शहरात व परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मीना यांनी शांतता कमिटीच्या बैठकीदरम्यान केले.
केज पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी नुकताच पदभार घेतलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मीना यांच्या उपस्थितीमध्ये शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील जबाबदार नागरिकांसह पत्रकारांची उपस्थिती होती. यावेळी कमलेश मीना यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बोलताना केजवासीयांना शांतता तसेच कायदा व सुरक्षितता आबाधित राहील असा शब्द दिला. तसेच मी जोपर्यंत केज मध्ये आहे तोपर्यंत कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असेही बोलून दाखवले. इतर विषयावर बोलताना मीना यांनी ट्रॅफिकचा, घरफोडीचा प्रश्न असेल छेडछाडीची समस्या असेल यावर विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच सध्या सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल द्वारे पैशाची देवाणघेवाण करण्याविषयी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. कुठे अवैध दारू विक्री होत असेल, मटका चालू असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे सुचित केले. त्याचबरोबर पोलिसांकडून तात्काळ मदत नाही मिळाली तर थेट माझ्याकडे या असेही आवाहन केले.
केज शहरामध्ये ट्रॅफिकचा मोठा प्रश्न दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर पार्क न करता रस्त्याच्या कडेला करावीत आणि अपघातापासून इतरांचा व स्वतःचा बचाव करावा असे सांगितले. घरफोड्या मोठ्या प्रमाणावर होत असताना याबाबत नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे असून एखाद्या कुटुंबाला बाहेरगावी जायचे असेल तर घरामध्ये रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने न ठेवता ते बरोबर घेऊन जावेत किंवा कुठेतरी ते सुरक्षित ठेवावेत असाही सल्ला दिला. आपल्या पाल्यांवरही लक्ष ठेवून ते कांही चुकीचे करत असतील तर समज देण्याचे काम पालकांनी वेळीच करावे असेही सांगितले.
दरम्यान केज शहर हे शांतता टिकऊन ठेवणारे शहर आहे. या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय सलोखा असल्याचे लक्षात आले असून आतापर्यंत जसे आपण शांतता आबाधित ठेवली आहे. त्याच प्रकारची शांतता कायम ठेवण्यासाठी शहरवासीयांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले. तर आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या समोर आणण्याचे सर्वांनाच अधिकार आहेत. मात्र त्या आंदोलनाला कोणी वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही दिला. केजचे पोलीस चांगले काम करत आहेत. त्यामुळे शहरवासीयांनी कसल्याही प्रकारची भीती न बाळगता निर्भय रहावे असा विश्वास दाखवला.