आपला जिल्हा
रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण, गावकरी आक्रमक….!
।केज दि.१६ – वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून चालण्यास तसेच वाहनास होत असलेला अडथळा निर्माण केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.वारंवार सांगूनही अतिक्रम काढल्या जात नसल्याने तालुक्यातील धर्माळा येथील नागरिक आक्रमक झाले असून तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात उपोषणाचा इशारा दिला आहे.
साबला-ते-धर्माळा रस्त्याचे दुरुस्तीचे काम मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबीत आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामास साबला येथील इसम चंद्रसेन सोनाजी काकडे व त्याचे कुटूंबीय विनाकारण रस्ता अडवत आहेत. अशातच चंद्रसेन सोनाजी काकडे व त्याचे कुटुंबीयांनी मागील दोन महिन्या पासून रस्त्यावर पत्र्याचे शेड मारले आहे. तसेच जनावराचा चारा (भुसकट), दगड, मोठ-मोठी लाकडे रस्त्यावर टाकून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. शासन यंत्रणा व रस्ता दुरुस्त करणारे संबंधीत कार्यालय कुठलेही कारण नसताना रस्ता दुरुस्त करत नाहीत. त्यामुळे मोजे धर्माळा येथील गावकऱ्यांस रहदारी करणे कठीण झालेले आहे. रहदारी करीता धर्माळा ते साबला हा एकमेव सोईचा रस्ता आहे. शेतमाल बाजारात घेऊन जाण्याकरीता विशेषतः ऊस कारखाण्यास घेऊन ज्याण्याकरीता तोच एकमेव रस्ता आहे.
रस्त्यावर अतिक्रमण केल्याने ऊसाचे ट्रक्टर व ट्रक रस्त्यावर घेऊन जाता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा ऊस शेतातच वाळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यापुर्वीही गावकऱ्यांनी अनेकवेळा अर्ज व निवेदन शासन दरबारी केलेले आहेत. मात्र शासकीय यंत्रणा लक्ष देत नाही.
दरम्यान, साबला ते धर्माळा जाणाऱ्या रस्त्यावर चंद्रसेन सोनाजी काकडे व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीस खुला करुन दयावा. अन्यथा मौजे धर्माळा येथील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच गावकरी दि. १९/०१/२०२४ रोजी सकाळी १० वाजता आपल्या कार्यालया समोर उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे. मात्र सदरील रस्ता रुंदीकरण करताना संबंधित शेतकऱ्याच्या क्षेत्रातून गेला असल्याचे बोलल्या जात असून त्याप्रकरणी न्यायालयात वाद प्रलंबित आहे.