शेती
दुष्काळाची झळ तर सर्वांनाच मात्र जिल्ह्यातील केवळ तिनच तालुक्यात दुष्काळाची दुसरी कळ…..!
बीड दि. १४ – यंदा पावसाने पाठ फिरविल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेले आहे, तसेच तलावांमधील पाणीसाठा देखील पुरेसा नाही, संपूर्ण जिल्ह्यातच हंगामी पैसेवारी देखील ५० पैशांपेक्षा कमी आहे. असे असताना राज्यातील दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांच्या यादीत मात्र बीड जिल्ह्यातील केवळ ३ तालुक्यांचा समावेश झाला आहे. या तालुक्यांमधील पिकांच्या नुकसानीची माहिती कृषी आयुक्तालयाने मागविली आहे.
राज्यातील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरी कळ दिसत असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे.
चालू वर्षाच्या खरीप हंगामात संगणकीय प्रणालीद्वारे दुष्काळाचे मूल्यांकन केले जात आहे. यात पावसाची परिस्थिती, पावसामधील खंड, त्या काळातील उष्मा, आर्द्रता आदी बाबींचा विचार करून दुष्काळाची कोणती कळ लागू होते हे पहिले जाते. आणि त्यानुसार त्या परिसरात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात शासन निर्णय घेते. त्या मूल्यांकनामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारूर आणि वडवणी या तीन तालुक्यात दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली असल्याचे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. राज्यातील ४२ तालुक्यांमध्ये हे चित्र आहे. आता या तालुक्यांमधील पिकांचे नेमके किती नुकसान झाले याचे रँडम १० गावांमध्ये पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी आणि अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मराठवाड्यातील या तालुक्यांचा समावेश
बीड : अंबाजोपगाई, धारूर , वडवणी
छत्रपती संभाजीनगर : सोयगाव , छत्रपती संभाजी नगर
धाराशिव : लोहारा , धाराशिव, वाशी
लातूर : रेणापूर
जालना : अंबड, बदनापूर , भोकरदन , जालना, मंठा