#Accident
नवरदेवासह बहीण आणि भाची अपघातात जागीच ठार….!
अंबाजोगाई दि.३१ – महिनाभरावर आलेल्या लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई जवळ वाघाळा पाटी जवळ आज रविवारी (दि.३१) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास झाला.
लातूर जिल्ह्यातील बिटरगाव तांडा (ता. रेणापूर) येथील सेवालाल पंडित राठोड (वय २१) या तरुणाचा येत्या २८ एप्रिल रोजी विवाह होणार होता. या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल आज रविवारी राडी तांडा (ता. अंबाजोगाई) येथील बहीण दिपाली सुनील जाधव (वय २०) आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता. लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला होता. ते वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणाऱ्या लातूर – छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसखाली दुचाकी फरफटत जाऊन सेवालाल, बहीण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला. सेवालाल आणि दिपाली हे त्यांच्या मातापित्यांचे एकुलते एक अपत्य होते. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी स्वाराती रुग्णालयात धाव घेतली.