राजकीय

आपला पगार किती, बोलता किती…..? आ. पडळकरांची खा. संजय राऊत यांच्यावर प्रखर टीका……..!

मुंबई दि.18 – मागच्या कांही महिन्यांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच पुन्हा एका प्रखर पत्राची भर पडली आहे. यामध्ये भाजप चे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खा.संजय राऊत यांच्यावर प्रखर भाषेत टीका केली असून सध्या हे पत्र सोशेल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. काय लिहिले आहे पत्रात वाचा सविस्तर……..

आदरणीय संजय राऊत साहेब,

मी आपणास खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे उद्बोधन देऊन लिहू शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकुचंद पडळकर असा केला आहे, या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता पण ती माझी संस्कृती नाही.प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे, हा संस्कार मला माझ्या आई वडिलांनी दिला.

आपण सामनाच्या अग्रेलेखात जी मुक्ताफळे उधळली आहेत ती मी मुद्दाम लोकांना कळावित म्हणून मी लिहित आहे. त्या अग्रलेखात आपण असे लिहले आहे की, “महाराष्ट्रात हुकूमशाही वा आणिबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकुचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरूंगात टाकले असते, पण फेकुचंदाना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे.”

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मी धनगरी पेहराव करून ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण व भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत असा त्यामागचा उद्देश. मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी,समाजाच्या सुखदु:खाशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या धनगर बांधवाचे दु:ख सरकार दरबारी मांडण्यासाठी एकदा नाही तर हजारवेळा येईन, ते स्वातंत्र्य मला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिले आहे.पण सत्तेच्या धुंदीत ज्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते, मराठा मोर्चांना जे ‘मुका मोर्चा’ म्हणणाऱ्या सामानाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार? राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली आहे? याचेही उत्तर द्यावे. सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरू आहे, याचा अंदाज तरी कसा येणार?

‘राज्याच्या प्रतिष्ठेवर दारूची गुळणी’ करणाऱ्याला जाब विचारतानाच दारूची दुकानं उघडून मंदीर बंद ठेवण्याने राज्याची कोणती प्रतिष्ठा वाढली गेली ? हे पण संजय राऊतांनी सांगावे. फक्त टिका केली म्हणून एखाद्या नटीला जेरीस आणायचं अन् ‘उखाड दिया’ म्हणत अशा भुरट्या मर्दानगीच प्रदर्शन मांडायचं. हे कसलं स्त्रीदाक्षिण्य? ज्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देत तुम्ही आपलं राजकारण करता, त्यांचा आदर्श विसरलात का? शत्रुगटातील स्त्री असली तरी तिची खणानारळानं ओटी भरून यथोचित सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. का तेही महाविकास आघाडीत जाऊन विसरले?

संजय राऊतजी आपला पगार किती आणि आपण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडूण आले ते भाजपच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडूण आलेले आहेत. याचा इतक्या लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वाट्टेल ते आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? उठसुठं कोणत्याही विषयावर आणि व्यक्तींवर काहीही बरळायचे लायसन्स आपल्याला मातोश्रीतून मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले? हे महाराष्ट्राला कळू द्या.

शरद पवार यांच्याविषयी मी काही विधाने केली तेंव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता. ते साहजिकही आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत. असे शिवसेनेतील आमचे मित्र आम्हाला सांगत असतात. माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी ती मी आपल्याबाबातीत सोडलेली नाही. पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी बघता आपल्याला तीच उपाधी मी देखील द्यावी असे राहून राहून वाटते.

-गोपिचंद पडळकर

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close