#Accident
धारूर तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या जीपला अपघात, दोन ठार सात जखमी…..!
धारूर दि.२१ – तालुक्यातील कोयाळ येथून ऊसतोडणीला गेलेल्या मजुरांना घेऊन गावाकडे परत निघालेले वाहन परळी तालुक्यातील सरफराजपूर जवळ पलटी झाले. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर अन्य सात जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास झाला.
धारूर तालुक्यातील कोयाळ येथील ऊसतोड कामगार सोमवारी सकाळी ऊसतोडणीसाठी गेले होते. रात्री कोयाळला परत येत असताना सरफराजपूर नजीक चालकाचे नियंत्रण सुटून त्यांचे चारचाकी वाहन पलटी झाले. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने विशाल गौतम वाव्हळे (वय १८) आणि वैजनाथ रामा वाव्हळे (वय ६५) दोन्ही रा. कोयाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर, जीपमधील बाळासाहेब कोंडीबा मुंडे (३५), विश्वनाथ बालाजी वाव्हळे (५०), रमेश भगवान मुंडे (३४) सर्व रा. कोयाळ, अरुण नामदेव गायकवाड (६०), शोभा गायकवाड (५५) दोन्ही रा. तळेगाव, अनिता संजय डोंगरे (४०) आणि संजय दासू डोंगरे (५०) रा. हिंगणी हे सात जण जखमी झाले.
दरम्यान, अपघातानंतर कोयाळ ग्रामस्थांनी जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. जखमीपैकी बाळासाहेब मुंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लातूरला हलवण्यात आले आहे तर इतरांवर अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत.