आपला जिल्हा
बीड जिल्ह्यात सरसकट शाळा सुरू होणार नाहीत, कांही वर्गाच्या विद्यार्थ्यांना वाट पहावी लागणार…….!
बीड दि.२१ – जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सरसकट शाळा सुरू होणार नसल्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिक्षण विभागाला दिल्या असल्याचे बोलल्या जात आहे. परंतु १० व १२ चे वर्ग सुरू होणार असून प्राथमिक शाळांना कुलुप उघडण्यासाठी आणखी कांही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
राज्यातील शाळा ( दि. २४) सोमवार पासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनास निर्णय घेण्याचा अधिकार दिला. बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आज बीड तालुक्यात ११३ तर पुर्ण जिल्ह्यात २९५ इतकी बाधितांची संख्या आहे. हे वाढते रुग्ण पहाता प्रशासन सावध पवित्रा घेत असून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाशी चर्चा केली.
दरम्यान, वाढता कोरोना संसर्ग पहाता सोमवारी जिल्ह्यातील शाळा उघता येणार नसल्याचे विभागाला सांगितले आहे. वाढत्या संसर्गाचा अंदाज घेऊन शुक्रवार नंतर इतर वर्गांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे . परंतु येत्या सोमवारपासून दहावी बारावीचे वर्ग सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने अद्याप स्पष्ट आदेश दिलेले नाहीत त्यामुळे आदेशानंतर नेमकं प्रशासनाची काय भूमिका आहे ते लवकरच स्पष्ट होईल.