उसाच्या वाड्यावरून मारहाणीत एकाच हात फॅक्चर ; चौघांवर गुन्हा….!
उसाच्या वाड्यावरून मारहाणीत एकाच हात फॅक्चर ; चौघांवर गुन्हा
केज दि.24 – उसाचे वाडे का घेऊ दिले नाही अशी भांडणाची कुरापत काढून एका दाम्पत्यास लाथाबुक्याने व काठीने केलेल्या मारहाणीत पतीचा हात फॅक्चर झाल्याची घटना सोनीजवळा ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सोनीजवळा येथील शरद बन्सी पवार व त्यांच्या पत्नीस उसाचे वाडे का घेऊ दिले नाही अशी भांडणाची कुरापत काढून जयसिंग राजाराम पवार, राहुल राजाराम पवार, राजाराम बन्सी पवार, दत्ताबाई बन्सी पवार या चौघांनी शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्याने केली. तर राहुल पवार याने काठीने हातावर मारहाण केल्याने या मारहाणीत शरद पवार यांचा डावा हात फॅक्चर झाला. ही घटना २२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली असून २४ एप्रिल रोजी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंग पवार, राहुल पवार, राजाराम पवार, दत्ताबाई पवार या चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत.
शेडसाठी आणलेले ६६ हजाराचे लोखंडी पत्रे, पाईप चोरले
शेतात पत्र्याचे शेड करण्यासाठी आणून ठेवलेले ६६ हजार १६० रुपयांचे १४ लोखंडी पत्रे व १७ लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना टाकळी ( ता. केज ) शिवारात घडली. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कोठी ( ता. केज ) येथील शेतकरी बप्पा प्रभू डोंगरे यांची केज – मांजरसुंबा रस्त्यालगत टाकळी शिवारात सर्वे नं. १०७ मध्ये जमीन आहे. या जमिनीत पत्र्याचे शेड करण्यासाठी डोंगरे यांनी १४ लोखंडी पत्रे व १७ लोखंडी पाईप खरेदी करून शेतात आणून ठेवले होते. शेतात कोणी नसल्याची संधी साधून १९ एप्रिल रोजी रात्री ७ ते २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ६६ हजार १६० रुपयांचे १४ लोखंडी पत्रे व १७ लोखंडी पाईप चोरून नेले. २३ एप्रिल रात्री बप्पा डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक बाळू सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.
दारुसाठी पैसे दिले नाही, पत्नीस मारहाण करीत पतीने मंगळसूत्र तोडून नेले
दारू पिण्यास पैसे न देणाऱ्या पत्नीस मारहाण करीत पतीने चक्क गळ्यातील मणीमंगळसूत्र बळजबरीने तोडून नेले. तर जाताना हा प्रकार तुझ्या भावास व आईला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी ही दिल्याची घटना केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे घडली.
चिंचोलीमाळी येथील शोभा संतोष नेमट ही महिला २२ एप्रिल रोजी रात्री ७ वाजेस सुमारास घरी असताना तिचा पती संतोष कारभारी नेमट हा घरी आला. त्याने दारू पिण्यास पैसे मागितले. मात्र पत्नीने पैसे नाहीत असे सांगताच त्याने हातावर बुक्या मारून बांगड्या फोडल्या. तोंडावर चापट मारत असताना भांडण सोडविण्यास आलेल्या मुलास मारहाण केली. पत्नीच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र तोडून नेले. तर जाताना हा प्रकार तुझ्या भावास व आईला सांगितल्यास फाशी देऊन मारून टाकीन अशी धमकी ही दिली. अशी फिर्याद शोभा नेमट यांनी दिल्यावरून पती संतोष नेमट याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक अशोक गवळी हे तपास करत आहेत.
दरम्यान, शेती नावावर करून देत नाहीस म्हणून मुलगा शुभम नेमट याने लाथाबुक्याने व कमरेच्या बेल्टने मारहाण करीत चटणी कुटण्याचा लोखंडी ठोंब्या डोक्यात मारून डोके फोडल्याची फिर्याद संतोष नेमट यांनी मुलगा शुभमविरुद्ध दिल्याने केज पोलिसात तत्पूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे.