क्राइम
मुलाच्या विरुद्ध बापाची पोलीसांत धाव…..!
केज दि.१९ – एकीकडे पोटच्या मुलासाठी स्वतःचा जीव गमावलेल्या मातेचे उदाहरण ताजे असतानाच जमिनीच्या तुकड्यासाठी जन्मदात्या माता पित्याला मारहाण करून घरात डांबून ठेवल्याची घटना तालुक्यात घडली आहे.
तालुक्यातील देवगाव येथे सौदागर रामराव मुंढे यांचे कुटुंबीय आहे.त्यांना एक मुलगा असून व्यसनाच्या आहारी गेलेला आहे.दारू पिऊन घरी येणे आणि भांडण तंटा करणे हे नित्याचेच. असाच उत्तरेश्वर नामक त्यांचा मुलगा दि.१७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घरी आला व जमीन वाटून का देत नाहीत ? असे म्हणून भांडण उकरून काढले. तो एवढ्यावरच न थांबता धिंगाणा घालत माता पित्याला शिवीगाळ करत लथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दोघांनाही रात्रभर घरात डांबून ठेवले.
दरम्यान, सौदागर रामराव मुंढे यांच्या फिर्यादीवरून उत्तरेश्वर सौदागर मुंढे याच्या विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भालेराव हे पुढील तपास करत आहेत.