महिला पोलीस निरीक्षकासह पतीलाही अटक……!
भ्रष्टाचारावर आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या आणि भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ अशी ओळख असणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कुंपनच शेत खातंय या म्हणीचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यात आला आहे. तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन मध्यस्थांमार्फत लाच मागणाऱ्या महिला पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. मीना बकाल असे या निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पतीलाही अटक करून या दोघांचीही रवानगी कोठडीत करण्यात आली.
अहमदपूर येथील खाजा मगदूम शेख यांच्या भाऊ शेख मेहराज यांचा कंधार येथील तहसील कार्यालयासमोर कागदपत्रे तयार करून देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या भावाला एसीबी कार्यालयातून तुमच्या विरोधात तक्रार आली आहे. त्याची चौकशी करण्यासाठी बोलाविण्यात आले आहे, असे सांगण्यात आले होते. ही बाब त्यांनी खाजा मगदूम शेख यांना सांगितली. त्यानंतर शेख यांना सय्यद शकील सय्यद अजीमसाब आणि सय्यद इस्माईल सय्यद अजीम या दोघांनी संपर्क साधून कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. सदर प्रकरणी खाजा मगदूम शेख यांनी मुंबई आणि औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली होती. 21 नोव्हेंबर रोजी सापळा रचून दोघांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एसीबीने पोलिस निरीक्षक मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावसकर या दोघांना अटक केली. बकाल यांनी मध्यस्थाकडून या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तक्रारदाराच्या भावाला वेगवेगळ्या क्रमांकावरुन आलेल्या कॉलची तपासणी करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिस निरीक्षक मीना बकाल, कुलभूषण बावसकर आणि इतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.