क्राइम
अल्पवयीन मुलीवर अत्याचार : केज पोलीसांत गुन्हा दाखल….!
केज दि.16 – तालुक्यातील एका आदिवासी वस्तीवर आई – वडील बाजाराला गेल्याची संधी साधून एका नात्यातील व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलीने ही माहिती चार दिवसांनी आईला सांगितली असता या प्रकाराने आपली समाजात नामुष्की होईल या भीतीने मुलीच्या आईने मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.
केज तालुक्यातील एका आदिवासी वस्तीवर दि 8 /2//2023 रोजी मुलीचे आईवडील बाजाराला गेल्याची संधी साधून एक नात्यातील व्यक्ती घरी आला व मुलगी घरी एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गेला. मुलीने ही माहिती चार दिवसांनी आईला दिली. त्यानंतर आई, वडील त्यांच्या इतर नातेवाईकांकडे गेले व त्याच्या मोबाईल वर कॉल केला असता त्याच्या मामाने कॉल घेतला, व मुलीच्या आईला त्याने धमकी देऊन, विनाकारण विषय वाढवू नको, नसता तुझ्या मुली प्रमाणे तुझ्यावर पण अत्याचार करीन म्हणून धमकी दिली. यामुळे मुलीच्या आईच्या मनावर परिणाम झाला व तणावाखाली येऊन तिने दि.14/2/2023 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची नोंद पोलीसांत करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक दिलीप गित्ते, महादेव बहिरवाळ, शमीम पाशा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी पार्थिव केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
पीडित मुलीचे वडिल तथा मयत महिलेचा पती याच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा व अत्याचार करीन म्हणून धमकी देणाऱ्या दोघां विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पिंक पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सीमाली कोळी ह्या करीत आहेत.