#Accident
कार पलटी होऊन महिलेसह एक जण ठार…..!
बीड दि.२० – जिल्ह्यातल्या बहुतांश ठिकाणी महामार्गावर असलेल्या सिमेंट रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत. गिरवली पूस महामार्गावरील कारच्या अपघातात महिलेसह एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातात कारचा अगदी चेंदामेंदा झाला असून रस्त्यावरील भेगामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली.
अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली ते पूस दरम्यानच्या महामार्गावर रविवारी (दि. १९) रात्री ९ वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील कार पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे.
महेश विष्णू कटारे (वय ३२, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई), मनीषा सुभाष डेरनासे (वय ३५, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई) असे दोन्ही मयतांची नावे आहेत. दोघांचेही मृतदेह स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, हा अपघात महामार्गावरील रोडला भेगा असल्याने कारचे टायर फुटून झाला असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे
मनीषा सुभाष डेरनासे यांच्या पतीचा १० वर्षांपूर्वी विहिरीत काम करत असताना क्रेनचे टोपले डोक्यात पडून अपघाती मृत्यू झाला होता. मनीषा यांना मुलगा प्रणव (वय १०), वैष्णवी सुभाष डेरनासे वय १७), आणि प्रणवी सुभाष डेरनासे (वय १५ ) अशी मुलांची नावे आहेत. मनीषा यांचे तिन्ही लेकरं उघड्यावर आले आहेत.