केज आंबेजोगाई रोडवरील होळ येथील होळेश्वर विद्यालयाच्या समोर (दि.१८) रात्री आठ वाजता होळ माहेर असलेल्या अलका राम कांबळे (रा. समता नगर अंबाजोगाई) ह्या घराकडे जात होत्या. मात्र घराकडे जात असताना एका कारने (MH12QW3695) त्या महिलेला धडक दिली आणि कार तशीच पुढे निघून गेली. सदर घटना घडल्यानंतर स्थानिकांनी सदर महिलेला आंबेजोगाईच्या रुग्णालयामध्ये दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. सदरील अपघात करणारा चालक तिथे न थांबता पुढे निघून गेला आणि त्याने ज्या ठिकाणी महिलेला धडक दिली तिथून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होळ सासुरवाडी असलेले वीटभट्टी कामगार दत्ता सरवदे रा. भोसा हे रोडच्या बाजूला उभा होते त्यांनाही धडक दिली, आणि त्या वीट भट्टी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. सदरील विटभट्टी कामगाराला धडक दिल्यानंतर ती कार एका खड्ड्यात जाऊन अडकली. आणि गाडी तिथेच सोडून चालक फरार झाला.
दरम्यान, युसुफवडगाव पोलिसांनी सदरील गाडी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती एपीआय योगेश उबाळे यांनी दिली.