ट्रक – कारच्या अपघातात न्यायाधीशासह चालकाचा दुर्दैवी मृत्यु…..!
बीड दि.१२ – ट्रकने ओमनीला दिलेल्या धडकेत दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे. हि घटना रेणापूर- उदगीर मार्गावरील सेवादासनगर तांडा येथे घडली. यामध्ये बीड येथील न्यायाधीश आणि त्यांचा चालक जागीच ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
उद्धव वसंत पाटील (रा. अजनसोंडा खु., ता.चाकूर) हे बीड येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत हाेते. शुक्रवारी ते चालक बळी नंदकुमार टमके (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) यांच्यासाेबत ओमनीने (एमएच १७ बीव्ही १२५७) गावाकडे निघाले हाेते. दरम्यान, रेणापूर- उदगीर मार्गावरील आष्टामाेडकडे जाताना सेवादासनगर तांडा येथे शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने (एमएच २४ एबी ८४०१) त्यांच्या वाहनाला जाेराची धडक दिली. यामध्ये न्यायाधीश पाटील आणि चालक टमके हे जागीच ठार झाले. मात्र ट्रकचालक न थांबता पसार झाला. घटनास्थळी तांड्यावरील युवक, नागरिकांनी धाव घेतली. ओमनीचा पार चक्काचूर झाल्याने त्या दाेघांनाही बाहेर काढण्यासाठी दीड तासाचा अवधी लागला.
दरम्यान, रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डाॅक्टरांनी दोघांनाही मृत घाेषित केले.