#Social
डी डी बनसोडे
September 12, 2025
आत्महत्ये सारखा मार्ग कुणीही स्वीकारू नका – मंत्री छगन भुजबळ…..!

लातूर दि.१२ – मागच्या कित्येक वर्षांपासून मिळालेलं आरक्षण आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकवणारच ज्यांना कुणाला आरक्षण हवे असेल त्यांनी स्वतंत्र आरक्षण घ्यावं. मात्र आमच्या आरक्षणावर अतिक्रमण करू नये असे मत राज्याचे मंत्री तथा अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांनी लातूर येथे व्यक्त केले. ते रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथे भरत कराड यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले त्यावेळी ते बोलत होते.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात वांगदरी येथे एका ओबीसी तरुणाने सरकारने ओबीसींची फसवणूक केली असे म्हणत नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. आणि त्यामुळे छगन भुजबळ यांनी वांगदरी येथे जाऊन कराड कुटुंबियांचे सांत्वन करत सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास दिला. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती. पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्या विरोधात आम्ही नाहीत. मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले, तसेच राज्यात दोन लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप केले तेव्हा आम्ही गप्प होतो. मात्र आता ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे असा अट्टाहास केला जात असल्याने आम्हीही आता आमचे आरक्षण वाचवण्यासाठी लढणार आहोत. मागच्या काही दिवसांमध्ये मराठा समाजाला २५ हजार कोटी आणि ओबीसी समाजाला केवळ ५ हजार कोटी महामंडळाकडून दिले हा कुठला न्याय ? असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला. आपले आरक्षण वाचवण्यासाठी आता ओबीसी समाजातील सुमारे साडेतीनशे घटकांनी एकत्र येत वज्रमुठ आवळली आहे. आम्हीही न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई लढण्यास सज्ज झालो आहोत असेही बोलून दाखवले.
दरम्यान, आरक्षणाची लढाई आपण लढू मात्र कुणीही आत्महत्ये सारख्या मार्गाचा अवलंब करू नये अशी कळकळीची विनंतीही केली.
अश्रू झाले अनावर….!
भरत कराड यांच्या घरी गेल्यानंतर ना.भुजबळ यांनी भरतच्या मुलाला जवळ घेतले तेंव्हा भुजबळांनाही गहिवरून आले आणि त्या बाळाचे अश्रू पुसताना अश्रू अनावर झाले.