केज तालुक्यात खळबळ….! एसीबीच्या जाळ्यात कनिष्ठ विस्तार अधिकारी आणि शिक्षक…..!
केज (प्रतिनिधी): केज पंचायत समितीच्या गट साधन केंद्रात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका शिक्षकाचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे अनुकूल स्वरूपात पाठवण्यासाठी चक्क २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या केज गट साधन केंद्रातील कनिष्ठ विस्तार अधिकारी दत्तात्रय मुरलीधर चाटे आणि तांदळे वस्ती शाळेचे शिक्षक जयगुरू गिरी यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (ACB) धाडसी कारवाई करत रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे केज तालुका शिक्षण वर्ततुळात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण शिक्षण विभाग आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड बदनामी झाली आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एका शिक्षकाचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे व्यवस्थित व अनुकूल स्वरूपात सादर करण्यासाठी कनिष्ठ विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तडजोडअंती एकूण २० हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते.
याबाबत तक्रारदाराने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता, वरील दोन्ही कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली.
शिक्षण विभागात उलटसुलट चर्चा आणि खळबळ
एसीबीसारख्या कठोर यंत्रणेने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे केज तालुक्याच्या शिक्षण विभागात तीव्र संताप आणि उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांवर आणि शिस्त पाळण्याची जबाबदारी असलेल्या विस्तार अधिकाऱ्यावरच लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाल्याने विभागाची मान खाली गेली आहे.
या भ्रष्ट प्रकारामुळे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी अशा मस्तवाल कर्मचाऱ्यांवर काय आणि कशी कारवाई करतात, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले असून प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.