आपला जिल्हा
केज तालुक्यातील भोपला येथे तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
केज दि.५ – विहिरीवरील विद्युत मोटार दुरुस्तीसाठी गेलेल्या एका २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील भोपला येथे शनिवारी दुपारी घडली. सत्यजित मारुती जाधव असे विहिरीत बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
भोपला येथील सत्यजित मारुती जाधव ( वय २७ ) हा तरुण शेतकरी त्यांच्या पळसाचे शेत नावाच्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार दुरुस्तीसाठी विहीरीवर शनिवारी दुपारी गेला होता. मोटार दुरुस्त करीत असताना त्याचा अचानक तोल गेल्याने विहिरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने सत्यजित जाधव याचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बिट जमादार अमोल गायकवाड, पोलीस नाईक अशोक गवळी, वैभव राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. चिंचोलीमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मारुती जाधव यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करत आहेत.