पूजा चव्हाण प्रकरणी याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश…….!
मुंबई दि.२५ – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सुनावणी सीबीआयकडे सोपवण्यात यावी आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी याचिकाही दाखल केली होती. न्यायाधीस एस. पी. देशमुख आणि गिरीश कुलकर्णी यांच्या बेंचसमोर या प्रकरणात सुनावणी सुरु होती.
सदरील प्रकरणामध्ये सरकारची बाजू मांडताना वकील दीपक ठाकरे यांनी चित्रा वाघ यांना अशा प्रकारची मागणी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला. यावर न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणात मयत मुलीच्या नातेवाईकांनी कोर्टात धाव घेतली होती का?, अशी विचारणा केली. तेव्हा वकील अतुल दामले यांनी बाजू मांडताना मयत मुलीच्या काही नातेवाईकांना धमक्या मिळत असून या प्रकरणाच्या तपासात फेब्रुवारीपासून कोणतीही प्रगती झालेली नसल्याची माहिती दिली.
दरम्यान, कोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेत, पुरावा असताना गुन्हा का दाखल करून घेतला नाही ? अशी विचारणा सरकारला केली आहे. तर यासोबतच येत्या दोन आठवड्यात याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.