इंदुरीकर महाराजांवरील खटला निकाली…….!
अहमदनगर दि.३० – कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्यासंबंधी दिलासा मिळाला आहे. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. आता इंदुरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांचे अपील मंजूर केले आहे. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात अपील केले होते. न्यायालयाने इंदुरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देत खटला रद्द करण्यात आला आहे.
”स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदुरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदुरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदुरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.