केज दि.३ – अंबाजोगाई रस्त्यावरील पिसेगाव फाट्यावर केज पोलिसांनी छापा मारून ३ हजार ९०० रुपये किंमतीच्या देशी दारूच्या १५० बाटल्या जप्त केल्या. तर दारू विक्री करणाऱ्या तरुणास अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, गुप्तचर शाखेचे पोलीस नाईक दिलीप गित्ते, बाळासाहेब अंहकारे, धनपाल लोखंडे हे शनिवारी अवैध धंद्यावर केसेस व पेट्रोलिंग करीत असताना त्यांना केज – अंबाजोगाई राज्य रस्त्यावरील पिसेगाव फाट्यावर एक तरुण देशी दारूची चोरून विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारला असता लक्ष्मण विलास काळे ( रा. पिसेगाव फाटा ता. केज ) या तरुणास देशी दारू विक्री करताना रंगेहाथ पकडले. पथकाने झडती घेतली असता ३ हजार ९०० रुपये किंमतीच्या देशी दारूच्या १५० बाटल्या आढळून त्या जप्त केल्या. गुप्तचर शाखेचे पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण काळे या तरुणाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.