आपला जिल्हा
डोक्यावर हेल्मेट अन तोंडावर मास्क अनिवार्य अन्यथा होणार कडक कारवाई – रविंद्र जगताप
डी डी बनसोडे
April 30, 2021
बीड दि.३० – मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे covid-19 संदर्भात दाखल फौजदारी सू-मोटो जनहित याचिके संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 26.04.2021 रोजी आदेश देऊन लॉकडाऊनच्या कालावधीतील निर्बंधांच्या अनुषंगाने नागरिकांनी बाहेर पडताना घ्यावयाची काळजी त्याचबरोबर प्रशासनाने घ्यावयाच्या दक्षता आणि करावयाच्या कार्यवाही बाबत सविस्तर निर्देश दिले आहेत त्यानुसार बीड चे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी लॉक डाउन निर्बंधांचे आदेश निर्गमित केले आहेत.
यामध्ये लॉकडाऊन निबंधातील सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते अकरा या कालावधी व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेसाठी वाहनाद्वारे कोणत्याही व्यक्तीस बाहेर जावयाचे असल्यास त्यांनी त्याच्या सोबत आधार कार्ड बाळगणे अनिवार्य राहील. आधार कार्ड नसल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र ठरेल, मात्र ऍम्बुलन्स मधिल कर्मचारी व रुग्ण यांना या आदेशातून सूट देण्यात आलेली आहे. डॉक्टर्स वैद्यकीय व निमवैद्यकीय कर्मचारी यांनी देखील त्यांचे सोबत आधार कार्ड बाळगणे अनिवार्य राहणार आहे. तसेच हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य राहील यामुळे डोळ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. घराबाहेर पडताना प्रत्येक व्यक्तीने नाक व तोंडावर व्यवस्थितपणे मास्क लावावा व्यवस्थित मास्क न लावणारे व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरून कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील.
त्याचबरोबर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी लॉकडाऊनच्या निर्बंधांचे भंग करणाऱ्या व्यक्तींच्या आधार कार्ड चा फोटो घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करू शकतील तसेच अशा व्यक्तींची Rapid Andign Test करण्याचेही सांगण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, म.न.पा. /ना.पा./जि.प./ग्रा.प. सदस्यांना लॉकडाऊन निर्बंधातून सूट दिली जाऊ नये तसेच त्यांनी या बाबतीत कोणत्याही दोषी व्यक्तींना सोडण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांवर दबाव अथवा प्रभाव टाकू नये.उपरोक्त निर्देश हे कर्तव्यावर नसलेल्या सर्व लोक सेवकांनाही लागू राहतील.
दरम्यान उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दाखल फौजदारी सुमोटो जनहित याचिकेत उपरोक्त प्रमाणे दिलेल्या निर्देशांचे जनतेने कसोशीने पालन करावे. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती कारवाईस पात्र राहतील असेही नमूद करण्यात आले आहे.