हा तर शिथिलतेचा गैरफायदा…….!
केज दि.11 – प्रशासनाने बीड जिल्ह्यात लॉकडाउन मधुन दोन दिवसांसाठी काहिसी सवलत देताच मंगळवारी सकाळीच केज शहरात प्रचंड गर्दी दिसून आली. वाहतुकीची कोंडी सोडविणे अवघड जावे इतकी गर्दी मुख्य रोडवर पहायला मिळाली.
प्रशासनाने मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस सकाळचे ३ तास काहिशी शिथीलता दिली होती यात किराणा दुकाने उघडायला परवानगी दिली होती. मात्र या सवलतीचा लोकांनी गैरफायदा उठविल्याचे चित्र पहायला मिळाले. सर्वच दुकानांवर झालेली प्रचंड गर्दी कोरोना संक्रमणाला निमंत्रण देणारी ठरु शकते. ही गर्दी आवरण्यात पोलीस आणि प्रशासन सपशेल अपयशी ठरले होते. यावेळी कसल्याच प्रकारचे कोरोना विषयक नियम पाळले गेले नाहीत.
दरम्यान तालुक्यात कोरोना संक्रमण दर दिवशी वाढत असून या काळात जनतेने अधिक सतर्कता आणि काळजी घेण्याची गरज आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी गर्दीत जाणे प्रत्येकाने टाळण्याची गरज आहे.