आपला जिल्हा
स्वाराती च्या डॉक्टरांनी घडवला चमत्कार……!
अंबाजोगाई दि. १६ – ( पांडुरंग केंद्रे) अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांची टिम अतिशय परिश्रम घेत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. असेच एक आश्चर्य चकीत करणारे उदाहरण आहे मेघराज चौधरी यांचे होय…! मेघराजवर उपचार चालू असताना त्यांची ऑक्सिजन पातळी ४० वर गेली. या कठीण परिस्थितीतही प्रयत्नांची परिकष्टा करुन स्वाराती च्या टिमने त्यांचा ऑक्सिजन ९६ वर आणुन त्यांना जीवदान मिळवून सुखरुप घरी सोडले.
कोवीड रुग्णावर उपचार करुन चमत्कार दर्शवणारी घटना अंबाजोगाई येथील रुग्णालयात घडली आहे. अंबाजोगाई शहरातील मोची गल्लीत राहणारे व येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे लिपीक या पदावर कार्यरत असलेले मेघराज प्रयागराज चौधरी यांना १० एप्रिल रोजी कोवीड उपचारासाठी युनिट ३ मध्ये दाखल केले होते. या ठिकाणी उपचार चालू असताना त्यांची ऑक्सिजन पातळी ४० पर्यंत घसरली होती. मेघराजची प्रकृती अस्वस्थ झाल्याचे लक्षात येताच त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या वार्ड क्र १७ मध्ये हलविण्यात आले. या ठिकाणी मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मेघराज यांच्यावर डॉ. सचिन चौधरी, डॉ. अनिल मस्के, डॉ. विश्वजित पवार, डॉ. विशाल लंगे, डॉ. अक्षय लंबेकर, डॉ. अस्मिता, डॉ. शुभम, डॉ. नविन सायनी डॉ, मस्तकिन शेख, डॉ. अभिषेक शर्मा यांनी उपचार सुरू केले. उपचार कालावधीत मेघराज सलग दहा ते बारा दिवस व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. सदरील उपचार कालावधीत ते अनेक वेळा अत्यवस्थ होऊन ते परत नाॅर्मल झाले आणि त्यांची प्रकृती सुधारत गेली. बारा दिवस व्हेंटिलेटरवर असणारे मेघराज स्थिर झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन पातळी नाॅर्मल होण्यासाठी परत आठ दिवस ऑक्सिजनवर ठेऊन उपचार करण्यात आले. ऑक्सिजन पातळी ४० वर गेलेली असताना त्यांना मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढण्याचा चमत्कार स्वारातीच्या कोविड रुग्णालयात घडला.
दरम्यान मेघराज यांची ऑक्सिजन पातळी ९६ च्या पुढे सरकल्यानंतर त्यांना रितसर डिस्चार्ज देऊन सुखरूप घरी सोडण्यात आले. मेघराज यांना पुनर्जन्म दिला असे शब्दसुमनाने चौधरी परिवाराने डॉ. स्वरातीच्या सर्व डॉ टिमचे आभार मानले.