क्राइम
पैशाचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग, पीडितेसह पतीला मारहाण, तर अन्य एका घटनेत भावाने केली भाऊ भावजयीस मारहाण……!
डी डी बनसोडे
June 21, 2021
केज दि.२१ – तुझा पती गरीब आहे, तुला पैसे पुरवितो असे म्हणत एका २२ वर्षीय महिलेचा विनयभंग करीत पीडित महिलेस आणि तिच्या पतीस मारहाण केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी शिरूरघाटच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील पीडित २२ वर्षीय महिला व तिचा पती हे दोघे केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हॉटेलवर कामाला आहेत. पीडित महिला ही २० जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हॉटेलवर काम करीत असताना आरोपी विक्रम सांगळे ( रा. सांगळे वस्ती, शिरुरघाट ता. केज ) याने पीडित महिलेजवळ येऊन तुझा नवरा गरीब आहे, मी तुला पैसे पुरवितो असे म्हणत पीडितेच्या हाताला धरून विनयभंग केला. पीडितेने आरडाओरडा केल्याने तिचा पती आला असता त्या दोघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून आरोपी विक्रम सांगळे याच्याविरुध्द केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे या पुढील तपास करत आहेत.
जोला येथे भावाने केली भाऊ, भावजयीस बेदम मारहाण
केज दि.२१ – जागेत जाळी का मारली अशी भांडणाची कुरापत काढून सख्या भाऊ व भावजयीस शिवीगाळ करीत दगड व लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील जोला येथे घडली. याप्रकरणी एक जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जोला येथील काकासाहेब सुंदर ऊगले यांनी माझ्या जागेत जाळी का मारली अशी भांडणाची कुरापत काढून रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्यांचा सखा भाऊ इंदर सुंदर ऊगले यांना दगडाने हातावर मारहाण करून दुखापत केली. तर त्यांच्या पत्नीस ही शिवीगाळ करून लाथाबुक्याने बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद इंदर ऊगले यांनी दिल्यावरून काकासाहेब ऊगले यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक सानप हे पुढील तपास करत आहेत.