क्राइम
कळंब तालुक्यात पोलीस निरिक्षकाच्या घरी दरोडा…..लाखोंचा ऐवज लंपास…..!
कळंब दि.२२ – तालुक्यातील हावरगाव येथे 20 जूनच्या मध्यरात्री अंकुशे वृद्ध दाम्पत्यांच्या घरात घुसून त्यांचे साडीने हात-पाय बांधून लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. सदरील घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून चक्क पोलीस निरीक्षकाच्या घरीच दरोडा पडल्याने चोरांचे मनोबल वाढल्याचे दिसत आहे.
येथील 82 वर्षीय निवृत्त ग्रामसेवक देविदास अंकुशे हे आपल्या पत्नी विमलबाई यांच्यासोबत रस्त्यालगतच्या शेतात बांधलेल्या बंगल्यात राहतात. त्यांचा मुलगा मधुसूदन अंकुशे हे नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत.
नेहमीप्रमाणे अंकुशे दाम्पत्य शनिवारी आपल्या निवासस्थानी झोपलेले होते. अचानक मध्यरात्री 1 वाजता आवाजाने अंकुशे यांना जाग आली. मात्र काही कळण्याच्या आत अज्ञात चार जण दरवाज्याचे कड्या-कोंडे तोडून आतमध्ये आले. त्यापैकी एकाने देविदास अंकुशे यांना पकडून ठेवले आणि सोनं आणि पैसे काढून दे म्हणून धमकावले. घाबरलेले अंकुशे यांनी लाकडी कपाटात असलेल्या पिशवीतून 30 हजार रुपये काढून दिले.
तर दुसऱ्या खोलीत असलेल्या 70 वर्षीय विमलाबाई यांना धमकावून कपटाची चावी घेतली. तेथे असलेल्या साडीने अंकुशे दाम्पत्यांचे हात-पाय बांधले. चावीने कपाट उघडून सोन्याच्या पाटल्या, गंठण, झुंबर, अंगठी असे एकूण 84 ग्रामचे सोने आणि 140 ग्राम वजनाच्या आभूषणासह रोख 30 हजार रुपये घेऊन चोरांनी पोबारा केला. अंकुशे यांनी शेजारी राहत असलेले पुतणे शिवाजी अंकुशे यांना आवाज दिला. त्यानंतर दीडच्या सुमारास त्यांची सुटका झाली.
दरम्यान देविदास अंकुशे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून कळंब पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर प्रकरणाचा तपास करण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. चोरी झालेल्या घरापासून काही अंतरावर श्वान पथकाने माग काढल्याने एका तीस वर्षीय संशयितास अटक करण्यात आली असून त्याला सोमवारी कळंब न्यायालयासमोर हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.