रुग्णावर उपचार करत असतानाच डॉक्टरवर काळाचा घाला……!
औरंगाबाद दि.27 – औरंगाबाद येथे आंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एक डाॅक्टर शस्त्रक्रीया करत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादमध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात असून या डाॅक्टरांचं नाव दिग्विजय शिंदे असं आहे. या घटनेनं संपूर्ण औरंगाबादमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. दिग्विजय शिंदे हे फिजिशियन इंटेंसिविस्ट होते. ते मूळचे इटखेडा येथील आहेत. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दिग्विजय प्रॅक्टिस करत होते. यादरम्यान ते दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया करत होते. मात्र शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. औरंगाबादेतील स्टेशन रोडवरील खाजगी रुग्णालय जीआय वन हॉस्पिटल येथे ते रुग्णाची छोटी झालेली अन्न नलिका मोठी करण्याची शस्त्रक्रिया करत होते. यावेळी त्यांच्यासोबत इतर डॉक्टर देखील उपस्थित होते. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुर्बिणीतून पाहत असताना डॉ. शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
दरम्यान ऑपरेशन थियटरमध्ये उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले आणि त्यांना वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. तात्काळ हृदयविकारतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आलं. परंतू सर्व प्रयत्न विफल ठरले आणि डॉ. दिग्विजय शिंदे यांचा मृत्यू झाला.