#Social
केज मध्ये तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर…..!

केज दि. १८ – महाराष्ट्र राज्याचे अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे कर्तव्यदक्ष आय. ए. एस. अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या उत्कृष्ट कार्याला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी दुपारी तीन वाजता केज शहरात सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्या पुढाकाराने कानडी रोड -मंगळवार पेठ -डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते केज तहसील कार्यालय अशी विद्यार्थी व युवकांची भव्य रॅली काढण्यात आली होती.
तुकाराम मुंडे हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. सध्या त्यांनी जनतेचे आयुष्य ज्यावर अवलंबून आहे अशा अन्न व औषधी विभागात कठोर कार्यवाही करत अन्न व औषध भेसळमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलून कार्यवाही सुरु केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे जीवन आपोआप सुरक्षित बनले आहे. एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक आणि निर्भय अधिकारी जनतेसाठी किती महत्वाचे कार्य करू शकतो व प्रशासनात आपली भूमिका कशी पार पाडू शकतो हे दाखवून दिले आहे. प्रत्येक आय ए एस व आय पी एस अधिकाऱ्याने आपले हक्क व अधिकार निर्भयपणे वापरल्यास जनतेला कसा मोठा फायदा होतो व जनतेचे हीत आणि कल्याण आपोआप सिद्ध होते हे त्यांनी दाखवले आहे.
तुकाराम मुंडे हे आता महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याचा पहारेदार बनले असून यापुढे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वर कोणतीही चुकीची किंवा व्यक्तीद्वेष्याची कार्यवाही करू नये नसता केज तालुक्यातील जनता त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरेल असा इशाराही निवेदनातून शासनाला देण्यात आला आहे.
केज शहराच्या मुख्य रस्त्यावरून काढलेल्या या रॅलीत विविध घोषणांनी केज शहर दणानून गेले होते. रॅलीमध्ये युवक युवती व नागरिकांसोबतच मनवेध अकॅडेमी व ज्ञानज्योती क्लासेस चे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप तहसील कार्यालय परिसरात तहसीलदार शुभम पवार यांनी निवेदन स्विकारल्या नंतर करण्यात आला. यावेळी विजय देशमुख, श्रीराम सारुक, ज्ञानेश कलढोणे यांनी मार्गदर्शन केले.