#Crime

भांडण सोडवणे बेतले जीवावर, चाकूने भोसकून तरुणाचा खून……!

6 / 100 SEO Score
केज दि. २१ – तालुक्यातील कदमवाडी फाट्यावर अनैतिक संबंधाच्या संशयावरून सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका हॉटेल चालकाचा चाकू भोकसून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विलास घुले असे मृत हॉटेल चालकाचे नाव असून, गंभीर जखमी झाल्यानंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना २१ जून रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केज परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
             कदमवाडी फाट्यावरील ‘हॉटेल गावकरी’चे चालक विलास घुले, आकाश चाळक, उमेश माने आणि स्वयंपाकी गणेश शुक्ला हे २० जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हॉटेलवर बसलेले होते. याच वेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड आणि त्यांचे इतर नातेवाईक तेथे आले. बाबासाहेब कदम याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून उमेश माने याला मारहाण सुरू केली. जीव वाचवण्यासाठी उमेश माने केजच्या दिशेने पळाला असता, त्याला वाचवण्यासाठी नितीन घुले आणि हॉटेल मालक विलास घुले हे देखील त्याच्या मागे धावले.
त्यांच्या पाठीमागे आलेल्या बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष कदम यांनी रेणु बारसमोरील बंद समर्थ बिअर बारजवळ नितीन आणि विलास घुले यांना अडवले. या सर्वांनी विलास घुले यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी बाबासाहेब कदम याने सोबत आणलेला चाकू नितीन घुले यांच्या समोरच विलास घुले यांच्या पोटात खुपसला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विलास घुले यांना तात्काळ केज येथील शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर शहरात निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफवडगाव, धारूर आणि नेकनूर येथून पोलिसांचा मोठा फौजफाटा केज शहरात तैनात करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close