आपला जिल्हा

नेकनूर येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेची प्रक्रिया वेगाने…..!

6 / 100 SEO Score
नेकनूर येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेची प्रक्रिया वेगाने…..!
नेकनूर, दि. २३ – बीड तालुक्यातील नेकनूर येथे नवीन अप्पर तहसील  कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, बीड यांनी याबाबतची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नेकनूरच्या प्रशासकीय मागणीला आता प्रत्यक्ष स्वरूप मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
               महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार बीड तालुक्यात नेकनूर येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कार्यालयाच्या मुख्यालय व अधिकार क्षेत्राबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असताना विधान परिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे ती स्थगित ठेवण्यात आली होती. आता आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदींनुसार नेकनूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यानुसार अप्पर तहसीलदार, नेकनूर यांना संबंधित क्षेत्रातील महसुली अधिकार व कर्तव्ये प्रदान करण्यात येणार आहेत.

कार्यालयाचे मुख्यालय नेकनूरमध्ये

प्रारूप अधिसूचनेनुसार अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय मौजे नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालय परिसरात प्रस्तावित करण्यात आले आहे. या मध्ये चार मंडळांचा समावेश नवीन अप्पर तहसील  कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात खालील चार महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे  नेकनूर,येळंबघाट, मांजरसुंबा,चौसाळा, लिंबागणेश
या मंडळांतील सर्व सज्जे तसेच गाव, वाड्या, तांडे आणि वस्त्या यांचा समावेश अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहणार आहे.
ग्रामस्थांमध्ये समाधान
नेकनूर हे बीड तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असून मोठी बाजारपेठ, शैक्षणिक व प्रशासकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी बीडला वारंवार जावे लागणार नाही. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.

कार्यान्वयनाची प्रतीक्षा

प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने आता अंतिम अधिसूचना व कार्यालयाच्या प्रत्यक्ष कार्यान्वयनाकडे ग्रामस्थांचे  लक्ष लागले आहे. शासनाने लवकरात लवकर आवश्यक कर्मचारी, पायाभूत सुविधा व प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करून देऊन नेकनूर येथील अप्पर तहसील  कार्यालय सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नेकनूर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत शासनाने प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केल्यामुळे नेकनूर व परिसरातील जनतेच्या अनेक वर्षांच्या मागणीला मूर्त स्वरूप मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. बीड तालुक्यातील सर्वात मोठे गाव, मोठी व्यापारी बाजारपेठ आणि ३० ते ३५ हजार लोकसंख्या असलेल्या नेकनूरसह परिसरातील ६० ते ७० गावांतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी बीड येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होतो.

अप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित झाल्यास उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, फेरफार, जमिनीशी संबंधित विविध महसुली कामे तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल आणि ग्रामीण भागातील नागरिकांना जलद व प्रभावी सेवा उपलब्ध होतील. प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध झाल्यामुळे नेकनूरच्या प्रशासकीय विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले असून आता शासनाने सर्व आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कार्यालय प्रत्यक्ष सुरू करावे, अशी परिसरातील जनतेची अपेक्षा आहे. अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास नेकनूरच्या विकासाला नवी गती मिळेल आणि परिसरातील लाखो नागरिकांचे प्रशासकीय प्रश्न स्थानिक पातळीवर सुटण्यास मदत होईल.”

 अशोक शिंदे

पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य, नेकनूर

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close