#Accident

केज – कळंब रोडवर भीषण अपघात…..!

6 / 100 SEO Score
 परतीच्या दिंडीतील एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ जखमी
केज दि. ३० – केज तालुक्यातील साळेगाव शिवारात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि विचित्र तिहेरी अपघात घडला. पंढरपूर आषाढी यात्रेवरून परतणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांचा ट्रॅक्टर, क्रूझर आणि एका कारची आपसात धडक झाली. या भीषण अपघातात एका वृद्ध वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.
             वाशिम जिल्ह्यातील संत राघोजी महाराज संस्थान (बोराळा) येथील ह.भ.प. नरहरी नारायण वानखेडे महाराज यांची दिंडी पंढरपूरहून वाशिमकडे परत जात होती. दिंडी केजच्या दिशेने जात असताना साळेगावजवळ समोरून येणाऱ्या क्रूझर गाडीने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेपाठोपाठ पाठीमागून येणारी एक कारही या वाहनांवर येऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरचे इंजिन (हेड) मध्यभागातून तुटून दोन तुकडे झाले. अपघातात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसलेले एक वृद्ध वारकरी रामदास महाले (७५) रा. मंगरूळ जि. वाशीम गंभीर जखमी झाले होते. त्यांना अंबाजोगाई येथील स्व. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्घटनेत ट्रॅक्टरमधील ७ आणि क्रूझरमधील ४ असे एकूण ११ वारकरी जखमी झाले आहेत. त्यापैकी ८ जखमींवर केज उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे, तर इतर ३ जखमींवर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील अपघात साळेगावच्या अगदी जवळ झाल्याने परिसरातील गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही दिरंगाई न करता गावकऱ्यांनी जखमींना वाहनांतून बाहेर काढून त्यांना निवाऱ्याच्या ठिकाणी हलवले व रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यास मोठी मदत केली.
           सदरील अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या सूचनेनुसार सहाय्यक फौजदार बाबासाहेब बांगर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात रवाना केल्यानंतर रस्त्यावर अडकलेली अपघातग्रस्त वाहने जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close