हवामान
पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता….!

पुणे दि.१५ – राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. राज्यात आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
सोमवारी मॉन्सूनने राज्याच्या बहुतांश भागातून माघार घेतली. राज्यात कमाल तापमानाचा पारा तिशीच्या पार आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा चटका वाढला आहे. तसेच पश्चिम-मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर बंगालच्या उपसागरात देखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यात आज सांगली सातारा, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर सिंधूदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम सरी तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर बुधवारी मात्र कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरीची शक्यता आहे. तसेच गुरुवारी रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला. अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, मॉन्सूनने सोमवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार घेतली आहे. गडचिरोलीचा काही भागात मॉन्सूनचा कालपासून मुक्काम आहे. मॉन्सूनच्या परतीची सीमा कारवार, कालबुर्गी, निजामाबाद, चांदबली, कंकर दरम्यान आहे. परंतु मॉन्सूनच्या परतीला पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसात मॉन्सून संपूर्ण देशातून निरोप घेण्याचा अंदाज आहे.