#Socialमहाराष्ट्र
अपघात किंवा दुर्घटनेत मृत व जखमी वारकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत….!

मुंबई दि. १५ – महाराष्ट्र शासनाने आषाढी वारी-२०२६ साठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारी कालावधीत (०७ जुलै ते २५ जुलै, २०२६) वारीसाठी जाताना किंवा परतताना अपघात अथवा दुर्घटनेत मृत पावलेल्या किंवा जखमी झालेल्या वारकऱ्यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान (आर्थिक मदत) देण्यात येणार आहे.
काय आहे शासनाचा निर्णय?
नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या, विषबाधा किंवा खून यांसारख्या घटना वगळता, केवळ अपघात किंवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी ही मदत लागू राहील. २७ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार या मदतीचे निकष ठरवण्यात आले आहेत.
मिळणारी आर्थिक मदत (तपशील):
अपघातात मृत्यू: वारकऱ्याच्या निकटच्या वारसदारांना ४ लाख रुपये, अपंगत्व आल्यास: ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास: ७४,००० रुपये, ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास: २.५० लाख रुपये, इस्पितळात (रुग्णालयात) दाखल झाल्यास:
एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी: १६,००० रुपये, एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी: ५,४०० रुपये.
कोणाला लागू असेल ही योजना?
ही योजना पंढरपूरकडे पायी किंवा खाजगी/सार्वजनिक वाहनाने प्रवास करणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी लागू असेल. यासाठी संबंधित वारकऱ्याने आषाढी वारी-२०२६ साठी पंढरपूरला गेल्याचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जाची प्रक्रिया:
संबंधित वारकरी किंवा त्यांच्या वारसांना मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी हे तहसीलदारांचे प्रमाणपत्र आणि मृत्यू/वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करून पात्र वारकऱ्यांना ही मदत मंजूर करून वितरित करतील.
वारी कालावधी संपल्यानंतर ३० जुलै २०२६ पर्यंत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील मदतीचा अहवाल व तपशील शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या (संकेतांक: २०२६०७१३२२१९१०९८१९).