ब्रेकिंग
ऐतिहासिक कामगिरी ! एशियन अंडर-२० कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुमित भारस्करने पटकावले सुवर्णपदक…..!

नवी दिल्ली दि. ५ – आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या मैदानात भारताचा दबदबा पुन्हा एकदा दिसून आला आहे. २०२६ च्या एशियन अंडर-२० इंटरनॅशनल फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू पै. सुमित कुमार भारस्कर याने आपल्या जबरदस्त कौशल्याच्या जोरावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या मल्लाचा पराभव करत त्याने भारताचा तिरंगा मानाने फडकवला आहे.
अंतिम फेरीत निर्विवाद वर्चस्व
स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुमित भारस्करचा सामना कझाकिस्तानच्या अत्यंत अनुभवी कुस्तीपटूशी झाला. सुरुवातीपासूनच सुमितने आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत सुमितने आपल्या तांत्रिक कौशल्याचा आणि चपळतेचा सुरेख नमुना सादर केला. अखेर १३-०७ अशा फरकाने कझाकिस्तानच्या मल्लाला पराभूत करून सुमितने सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
कुस्ती विश्वात आनंदाचे वातावरण
सुमित भारस्कर याच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशातून त्याचे कौतुक होत आहे. भारतीय कुस्ती महासंघासह क्रीडा प्रेमींनी सुमितच्या या यशाचे जोरदार स्वागत केले आहे. कझाकिस्तानसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला हरवून मिळवलेले हे यश आगामी काळातील मोठ्या स्पर्धांसाठी सुमितसाठी आत्मविश्वास वाढवणारे ठरेल.
सुमितचे हे यश केवळ त्याच्या वैयक्तिक कारकिर्दीसाठीच नव्हे, तर भारतीय कुस्तीच्या भविष्यातील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. सुमितने आपल्या मेहनतीतून आणि जिद्दीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे.