
केज दि. १० – व्यापाराच्या कामावर ठेवलेल्या एका विश्वासू मुनिमाने मालकाच्या स्वाक्षरीचे कोरे चेक चोरून तब्बल ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मुनीम फरार झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हाजी मौला सालेमसाहब सौदागर (वय ६५, रा. समता नगर, केज) हे ‘सौदागर ट्रेडिंग कंपनी’ नावाने केज मार्केट यार्ड येथे धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी व्यवसायातील आर्थिक व्यवहारांची जबाबदारी पाहण्यासाठी शेख अतिक (रा. धारूर, जिल्हा बीड) याला ऑक्टोबर २०२२ मध्ये २० हजार रुपये पगारावर मुनीम म्हणून कामावर ठेवले होते. शेख अतिक याने आपल्या कामातून मालकाचा विश्वास संपादन केला होता.
उपचारासाठी बाहेर असताना डाव साधला
फिर्यादी सौदागर यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना उपचारासाठी राजस्थानला जावे लागले. १७ जून २०२६ रोजी निघण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलाकडे देण्याकरिता चार कोरे चेक (क्रमांक ५८७२७०, ५८७२७१, ५८७२७४, ५८७२७५) दुकानातील कपाटात ठेवले होते. मात्र, याच संधीचा फायदा घेऊन मुनीम शेख अतिक याने हे चेक चोरले.
३४ लाखांचा गंडा
२३ जून २०२६ रोजी सौदागर यांना बँकेतून फोन आला की, त्यांच्या खात्यातून ३४ लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत. ही रक्कम पाहून सौदागर यांना धक्काच बसला. तपासणी केली असता, मुनीम शेख अतिक याने हे चारही चेक स्वतःच्या किंवा त्याच्या नातेवाईकांच्या खात्यावर वटवून ३४ लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचे निष्पन्न झाले. इतकेच नाही, तर त्याने दुकानातील ५०० ते ६०० पोती सोयाबीनही बेकायदेशीरपणे विकून ३०-४० लाख रुपयांचा अपहार केल्याचे मालकाला समजले.
आरोपी फरार, पोलिसांत गुन्हा दाखल
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुनीम शेख अतिक याने आपला मोबाईल बंद करून पोबारा केला आहे. २७ जून रोजी परत आल्यावर शोध घेतला असता तो मिळून आला नाही. अखेर हाजी मौला सौदागर यांनी केज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.