आरोग्य व शिक्षण#Socialआहार विहार

केजमध्ये ‘नारीशक्ती’चा एल्गार: जवळबनमध्ये अवैध दारू विक्रीविरुद्ध महिलांचा ‘हल्लाबोल’….!

6 / 100 SEO Score
केज दि. १५ – (प्रतिनिधी) – तालुक्यातील जवळबन गावात फोफावलेल्या अवैध दारू विक्रीला कंटाळलेल्या महिलांनी बुधवारी आपल्या संयमाचा बांध सोडत थेट रस्त्यावर उतरून ‘हल्लाबोल’ केला. व्यसनामुळे उध्वस्त झालेली घरे आणि हक्कासाठी लढणाऱ्या महिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आक्रोश रॅली आणि महिलांचा रोष
जवळबन गावात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत, तर अनेकांना अकाली मृत्यूने गाठले आहे. या विळख्यातून गावाला मुक्त करण्यासाठी बुधवारी सकाळी आठ वाजता गावकरी आणि महिलांनी एकत्र येत आक्रोश रॅली काढली. हातात फलक आणि घोषणा देत महिलांनी थेट दारू विक्रेत्यांच्या घरांवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त महिलांनी प्रशासनाला धारेवर धरत अवैध धंदे तत्काळ बंद करण्याची मागणी केली.
लहान मुलींच्या डोळ्यात अश्रू
या आंदोलनात व्यसनाधीन कुटुंबातील महिला आणि लहान मुलींनी आपल्या व्यथा मांडताना हंबरडा फोडला. “आमचे वडील दारू पिऊन आम्हाला मारहाण करतात, घरातील वस्तू विकतात, आम्हाला जगणे नकोसे झाले आहे,” असे सांगताना लहान मुलींच्या डोळ्यातील अश्रू पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांची धडक कारवाई
एकीकडे महिला आंदोलने करत असताना, दुसरीकडे काही विक्रेते चोरून दारू विकत होते. याची माहिती मिळताच युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत पांडुरंग बाबुराव वैरागे, समाधान भगवान वैरागे आणि निलाबाई बंकट शिंदे यांच्यावर दारूबंदी अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली.
दारूबंदी समितीची स्थापना; तरुणांचाही सक्रिय सहभाग
या आंदोलनाची दखल घेत, भविष्यात गावात दारू विक्री रोखण्यासाठी सरपंच आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने ‘विशेष दारूबंदी समिती’ स्थापन करण्यात आली आहे. महिलांच्या या लढ्याला पाठिंबा देत गावातील तरुणांनीही दारू न पिण्याचा संकल्प केला असून, अवैध धंद्यांविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्याची शपथ घेतली आहे.
पोलीसांना निवेदन: ‘यापुढे चालणार नाही’
आंदोलनानंतर युसूफ वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल महेश कोकाटे यांना तब्बल ४०० महिलांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. “यापुढे गावात कुठेही अवैध दारू विक्री आढळून आल्यास थेट हल्लाबोल केला जाईल,” असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.
“गावात दारू विक्रीमुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. आता आमचा संयम संपला असून, गावात एकही थेंब दारू आम्ही खपवून घेणार नाही. ही दारूबंदी समिती यापुढे गावात कठोर पहारा देणार आहे.”
            संतप्त महिला ग्रामस्थ, जवळबन

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close