शुक्रवारी केज शहरात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा….!

केज दि.१८ – २ सप्टेंबरला काढलेल्या जीआर मुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला असून ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याची भावना ओबीसी समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण नको आणि दोन सप्टेंबरला काढलेला जीआर तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी केज शहरामध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षणाचा प्रश्न हा दिवसेंदिवस जटील होत चाललेला आहे. आम्हाला आरक्षण हवे, आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण नको या विचारांमुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर दरी निर्माण होऊ लागलेली आहे. आपल्याला असलेले आरक्षण जाते की काय आणि मग आपल्या लेकरा बाळांचे काय होणार ? अशी भीती ओबीसी समाजामध्ये पसरली आहे. त्यातच २ सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने काढलेला जीआर हा ओबीसी आरक्षण संपवण्याचा कट असल्याचे म्हणत काढलेला जीआर तात्काळ रद्द करावा अथवा त्यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रभर ओबीसी समाज बांधव निदर्शने, आंदोलने करू लागलेला आहे. याचाच एक भाग म्हणून केज येथेही दिनांक १९ सप्टेंबर रोजी ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा निघणार आहे. शहरातील जय भवानी चौकातून सकाळी ११ वाजता सदरील मोर्चाला सुरुवात होणार आहे.