Challenge
केज येथे शुक्रवारी केज विकास संघर्ष समितीचा रस्ता रोको….!

केज दि. १६ – तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघातीय मृत्यू, कानडी रस्ता दुरुस्ती व लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाचे बांधकाम वेळेत व उत्कृष्ठ दर्जाचे व्हावे या तीन प्रमुख मागण्यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता केज तहसील कार्यालयासमोरील महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी दिली आहे.
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा 9 एप्रिल रोजी लातूरच्या रेणापूर नजीक कार अपघातात मृत्यू झाला. मात्र घटनास्थळी गाडीचे दोन्ही दरवाजे बंद असतांना त्यांचा मृतदेह बाहेर कसा आला? त्यांचा मोबाईल, लॅपटॉप सह इतर महत्वाचे साहित्य नेमके कुठे आहे? तहसीलदार पदावर असणाऱ्या इतक्या महत्वाच्या व्यक्तीच्या बाबतीत पोलीस तात्काळ व योग्य तपास का करत नाहीत? टोलनाका पार केल्यानंतर अपघात होईपर्यंत च्या काळात तहसीलदार कोठे होते व त्यांच्यासोबत कोण लोक होते ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने या अपघाताची पोलीस प्रशासन व वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून जनतेच्या मनातील शंका प्रशासनाने दूर कराव्यात अशी मागणी समितीने केली आहे.
याशिवाय शहरातील कानडी रोडचे दोन्ही बाजूने पंखा भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अर्धवट राहिले आहे. यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. वारंवार लेखी व तोंडी सूचना व निवेदने देऊनही हे काम पूर्ण केले जातं नाही. हे काम तातडीने दोन दिवसात पूर्ण करावे.
तसेच केज शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे सांस्कृतिक भवन नाट्यगृहाचे काम गेली एक वर्षांपासून सुरु आहे. हे काम सुरुवातीला चांगले केले गेले मात्र नंतर हे काम मंदगतीने व कांही ठिकाणी निकृष्ठ होत असल्याचे दिसत आहे. हे काम येत्या 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करून ते केज नगरपंच्यायत कडे हस्तान्तरीत करावे अशी मागणी समितीने केली आहे.
दरम्यान, या तीन मागण्यासाठी हे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात केजच्या जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. निवेदनावर हनुमंत भोसले, नासेर मुंडे, शेषराव घोरपडे, इंजि. कराड, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.