क्राइम
केज पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा…..!

केज दि. २२ – सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने छापा मारून पत्र्याच्या शेडमध्ये साठा करून ठेवलेला ४८ लाख ६४ हजार ८५४ रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कळंबकडून एक जीप गुटखा घेऊन केजकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या आदेशावरून फौजदार अमीरोद्दीन इनामदार, जमादार धोंडीराम मोरे, राजु वंजारे, सचिन क्षीरसागर यांच्या विशेष पथकाने २३ मे रोजी दुपारी ४.१५ वाजता गोटेगाव शिवारात सापळा लावून गुटखा घेऊन आलेली जीप (एम. एच. ४६ बी के ८११९) पकडली. जीप चालक संजय रामलिंग तपसे (रा. चंदनसावरगाव ता. केज) यास ताब्यात घेऊन गुटखा व जीप असा ६ लाख ५३ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. संजय तपसे याने हा गुटखा रंजीत नागनाथ आगाडे (रा.इंदीरा नगर, कळंब जि. धाराशिव) याच्याकडून आणल्याचे सांगितले होते.
दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम, सहाय्यक पोलीस महेश क्षीरसागर, फौजदार अमीरोद्दीन इनामदार, जमादार धोंडीराम मोरे, राजु वंजारे, सचिन क्षीरसागर, संपत शेंडगे यांच्या पथकाने रंजीत आगाडे याच्या मालकीच्या कळंब शहरातील पत्र्याच्या शेडवर छापा मारून ए – १० एस नावाचे सिगारेट, विमल पान मसाला, डायरेक्टर पान मसाला, यु. के. जाफरानी जर्दा असा ४८ लाख ६४ हजार ८५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जमादार धोंडीराम मोरे यांच्या फिर्यादीवरून संजय तपसे, रंजीत आगाडे या दोघांविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.