आपला जिल्हा

प्रशासकीय अनास्था की लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष….?

6 / 100 SEO Score

केज दि. ५ – स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करून देश प्रगतीची नवी शिखरे गाठत असल्याचा दावा केला जात असला, तरी ग्रामीण भागातील वास्तव मात्र आजही भीषण आणि संतापजनक आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील केज बोबडेवाडी शिवरस्ता (चिंचोलीफाटा ते सुरवसे वस्ती, गुंडवस्ती, हनुमान वस्ती) या रस्त्याची झालेली दुरवस्था प्रशासकीय नाकर्तेपणाचा आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा ठरत आहे.                             सध्या सुरु असलेल्या पावसाळी वातावरणामुळे हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? अशी अवस्था निर्माण झाली आहे. या चिखलामय रस्त्यावरून वाट काढताना शेतकरी, लहान मुले आणि वयोवृद्धांना दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे शेतात खते, बियाणे, अवजारे घेऊन जाणे किंवा पिकवलेला माल बाजारात आणणे अत्यंत खडतर बनले आहे. शेतीची मशागत पूर्णपणे ठप्प झाली असून बळीराजा हवालदिल झाला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत वेळेवर मशागत झाली नाही, तर होणाऱ्या अतोनात नुकसानाला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.

या समस्येचा सर्वात मोठा फटका वस्तीवरील चिमुकल्या शाळकरी मुलांना बसत आहे. दररोज याच दलदलीतून मुलांना शाळा गाठावी लागत असून, चिखलातून चालताना अनेकदा मुले घसरून पडतात, ज्यामुळे त्यांचे कपडे व पुस्तके खराब होतात. अपघाताची टांगती तलवार सतत डोक्यावर असल्याने पालकही प्रचंड चिंतेत आहेत. ‘शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचे’ दावे करणाऱ्या प्रशासनाला या चिमुकल्यांचा त्रास दिसत नाही का? असा उद्विग्न प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ०५ ऑगस्ट २०२६ रोजी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी एकत्र येत मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, केज यांना रीतसर निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे चिंचोलीफाटा ते सुरवसे वस्ती, गुंडवस्ती, हनुमान वस्ती या शिवरस्त्याची तात्काळ दुरुस्ती व खडीकरण करण्यात यावे आणि पावसाळ्यामुळे बंद पडलेली वाहतूक पूर्ववत करून शेतकरी व विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर किशोर रामभाऊ सुरवसे यांच्यासह विनोद अण्णाभाऊ, राजेंद्र गुंड, अशोक गुंड, भरत गुंड, समीर गुंड, संजय गुंड, त्रिंबक पाटील, सलीम शेख, प्रकाश गुंड, ज्ञानेश्वर गुंड, दिगंबर गुंड आदी सर्व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, मतदानाच्या वेळी मोठमोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता या चिखलात अडकलेल्या नागरिकांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत का, असा तिखट सवाल आता नागरिक विचारत आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा इशारा देत, प्रशासनाने या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close