बीड जिल्हा परिषदेतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे नियोजन जाहीर…..!

बीड दि. ९ – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद, बीड अंतर्गत ग्रामपंचायत विभागाच्या वतीने जिल्ह्यात “हर घर तिरंगा अभियान-२०२६” अत्यंत उत्साहात आणि प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) किशोर काळे यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्रकाद्वारे सविस्तर अतिरिक्त सूचना व दिननिहाय उपक्रमांचे निर्देश दिले आहेत. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान राबवले जाणार आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक घर, दुकान आणि खाजगी आस्थापनांवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवून नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग निश्चित करणे हा आहे. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान सर्व शासकीय कार्यालयांवर शासनाच्या प्रचलित नियमांनुसार आणि ‘फ्लॅग कोड ऑफ इंडिया’चे (Flag Code of India) काटेकोर पालन करून राष्ट्रध्वज फडकवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच १४ ऑगस्ट रोजी “फाळणीच्या वेदनांचे स्मरण दिन” (Partition Horrors Remembrance Day) निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिवसनिहाय आयोजित केले जाणारे उपक्रम:
- ०९ ऑगस्ट: तिरंगा यात्रा काढून अभियानाचा भव्य शुभारंभ.
- १० ऑगस्ट: शाळा व संस्थांमध्ये निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन.
- ११ ऑगस्ट: नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी तिरंगा मॅरेथॉन व सायकल रॅली.
- १२ ऑगस्ट: जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारतींवर तिरंगा रंगातील आकर्षक विद्युत रोषणाई.
- १३ ऑगस्ट: तिरंगा रॅली, देशभक्तीपर चित्रपटांचे प्रदर्शन; सर्व घरे, दुकाने व खाजगी-शासकीय आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकवणे.
- १४ ऑगस्ट: सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर उपक्रम आणि ‘Partition Horrors Remembrance Day’ निमित्त विशेष श्रद्धांजली व मार्गदर्शन कार्यक्रम.
- १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन): प्रभातफेरी, मुख्य ध्वजारोहण, शालेय स्पर्धा, बक्षीस वितरण, तिरंगा प्रतिज्ञा आणि सेल्फी अपलोड मोहीम.
- १६ ऑगस्ट: लोकजागृतीसाठी देशभक्तीपर चित्रपटांचे विशेष प्रदर्शन.
- १७ ऑगस्ट: तिरंगा प्रतिज्ञा, जनजागृती उपक्रम आणि अभियानाचा अधिकृत समारोप.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या दिननिहाय आराखड्यानुसार कार्यक्रमांचे काटेकोर आयोजन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. अभियानादरम्यान आयोजित सर्व उपक्रमांचे छायाचित्रे, संक्षिप्त अहवाल व आवश्यक माहिती विहित वेळेत जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही किशोर काळे यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.