#Social
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस आता साजरा होणार ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून….!

केज दि. ३० – प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या अलौकिक प्रतिभा आणि लेखणीच्या बळावर मराठी साहित्य विश्वात अमूल्य व भरीव योगदान दिले आहे. सातासमुद्रापार एक झुंझार लेखक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या जागतिक कीर्तीच्या साहित्यिकाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि समाजातील नव्या लिहित्या हातांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दरवर्षी १ ऑगस्ट हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
मराठी मनाला अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रेरणा मिळावी आणि समाजातील सर्वच स्तरांतील प्रतिभा व विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कविता, कथा, आणि निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन केले जाईल. तसेच विविध विषयांवर वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातील. स्थानिक साहित्यिकांच्या मुलाखती व व्याख्याने आयोजित करणे, ग्रंथ दिंडी काढून ग्रंथलेखनाचे महत्त्व पटवून देणे, आणि अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, लोकनाट्य व शाहिरीचे विद्यार्थ्यांनी वाचन करणे अशा विविध कार्यक्रमांचा यामध्ये समावेश असेल. याशिवाय अण्णा भाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्त्वावर व साहित्यिक कर्तृत्वावर व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा आणि साहित्य संमेलनांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च शिक्षण संचालक, तंत्र शिक्षण संचालक आणि कला संचालकांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व संस्थांना १ ऑगस्ट हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्याचे निर्देश द्यावेत, असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत.