क्राइम
डी डी बनसोडे
August 1, 2026
घरातील सोन्याचे हांडे काढून देण्याचे आमिष दाखवून ३ लाखांची फसवणूक…..!

केज दि. १ (प्रतिनिधी): घरात जमिनीखाली सोन्याचे तीन हांडे गाडलेले आहेत, ते काढून देतो असे आमिष दाखवून एका वृद्धाला तब्बल ३ लाख ३ हजार रुपयांना गंडवल्याचा खळबळजनक प्रकार केज तालुक्यातील बेलगाव येथे उघडकीस आला आहे. अंधश्रद्धेचा फायदा घेत महागडी आयुर्वेदिक औषधे खरेदी करायला लावून ही आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कान्हा रत्नसिंग चव्हाण (वय ६५, मूळ रा. सावरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती, सध्या रा. मस्साजोग) आणि बीड येथील सुभाष रोडवर असलेल्या ‘श्री अष्टविनायक आयुर्वेदिक भवन’चा मालक अमोल दिगंबर गिरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अशी घडली घटना:
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२६ रोजी जडीबुटी व आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारा कान्हा चव्हाण हा बेलगाव येथील रहिवासी सीताराम दगडू घुले (वय ६५) यांच्याकडे आला होता. सुरुवातीला त्याने घुले यांना मणक्याचा त्रास कमी करण्यासाठी औषध दिले. त्या औषधाने आराम वाटल्यामुळे सीताराम घुले यांचा कान्हा चव्हाणवर विश्वास बसला. या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपी चहा पिण्याच्या बहाण्याने घुले यांच्या घरात गेला. तिथे त्याने ‘तुमच्या घराखाली सोन्याचे तीन हांडे पुरलेले मला दिसत आहेत, ते मी तुम्हाला काढून देतो’ असा दावा करून त्यांना जाळ्यात ओढले.
लाखांचा गंडा आणि भोंदूपणाचा पर्दाफाश:
सोन्याचे हांडे काढण्याच्या विधीसाठी बीड येथील सुभाष रोड भागातील श्री अष्टविनायक आयुर्वेदिक भवन येथून महागडी औषधे आणावी लागतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार घुले यांनी टप्प्याटप्प्याने २० हजार, २२ हजार ५०0 आणि तब्बल २ लाख ६० हजार रुपयांची औषधे खरेदी केली. एवढा खर्च करूनही भोंदू कान्हा चव्हाण याने विधी पूर्ण करण्यासाठी आणखी ३ लाख ४५ हजार रुपयांची मागणी केली.
अचानक एवढ्या मोठ्या रकमेची मागणी झाल्याने सीताराम घुले यांनी आपल्या मुलाकडे पैशांची विचारणा केली. त्यावेळी त्यांच्या मुलाला संशय आला आणि हे संपूर्ण प्रकरण अंधश्रद्धेवर आधारित फसवणूक व थोतांड असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आणि कारवाई:
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सीताराम घुले यांनी तात्काळ केज पोलीस ठा गाठून आपबिती सांगितली. त्यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी पहाटे ५ वाजता कान्हा चव्हाण आणि औषध विक्रेता अमोल गिरी या दोघांविरुद्ध संगनमत करून खोटे आमिष दाखवणे, फसवणूक करणे, विश्वासघात आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने व त्यांच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवून सोन्याचे हांडे काढण्याचे आमिष दाखवणारा कान्हा चव्हाण आणि त्याला साथ देणारा औषध विक्रेता अमोल गिरी या दोघांनाही जेरबंद केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने करत आहेत.