
केज दि. ८ – केज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून केवड येथील पारधी वस्ती शेतातील सरकारी गायरान जमिनीत लावलेल्या १५ लाख रु. किमतीचा ७५ किलो ग्रॅम वजन असलेल्या गांजाची झाडे जप्त केली आहेत. तसेच या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
दि. ७ सप्टेंबर रोजी केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती समजली की, केज तालुक्यातील केवड येथील पारधी वस्ती शेजारी असलेल्या गायरान जमिनीत एकाने बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केली आहे. माहिती मिळताच त्यांचे अधिनिस्त असलेले डी बी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे आणि पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यासाठी नायब तहसिलदार केज फुलचंद हांगे, शासकीय पंच युवराज कसबे, किशोर राऊत, इलेक्ट्रीक वजन काटा धारक विजय सतीष थोरात, फोटो ग्राफर राहुल अंकुश थोरात यांना सोबत घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम आणि पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे आणि पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर, पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, महावीर सोनवणे, नितीन वारे, राहुल तरकसे, दादाराव देवगुडे, गोरख फड, संतोष गिते आणि शिवाजी कागदे यांनी सायंकाळी ठीक चिंचोली माळी मार्गे मौजे केवड शिवार येथील सरकारी गायरान जमिनीतील सर्वे नं. २२७ मध्ये पोहचुन मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन केज यांना बोलावुन घेतले.
पोलिसांनी सायंकाळी ६:३० वा. केवड शिवार येथील सरकारी गायरान जमिनीत असलेल्या एका पत्र्याच्या शेडजवळ उभ्या असलेल्या सुनिल शिवाजी पवार, (रा. केवड गायरान) याच्या घराच्या समोरील भागात पाहणी केली असता गवताच्या मध्यभागी व गवतामध्ये ठिकठिकाणी विना परवाना बेकायदेशिररित्या गांजा सदृष्य झाडांची लागवड करून, त्याचे संवर्धन व जोपासना करतांना मिळुन आले. पोलिसांनी नायब तहसीलदार फुलचंद हंगे आणि पंचा समक्ष सोबत असलेल्या पोलीस स्टाफच्या मदतीने लागवड केलेली गांजा सदृष्य झाडे उपटून ताब्यात घेतली. त्याचे वजन ७४.४३२ किलो ग्रॅम एवढे भरले असून त्याची किंमत १४ लाख ८८ हजार ६४० रु. एवढी आहे.
पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादी वरून सुनील पवार यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं ५७७/२०२६ गुंगीकारक औषधीद्रव्य व आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे प्रदार्थ अधिनियम, १९८५ चे कलम २०, ८(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे हे पुढील तपास करीत आहेत.