महाराष्ट्रराजकीय
एवढ्या पलट्या मारूनही मान वर….? – निलेश राणे
मुंबई दि.१६ – अवघ्या दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांंगलाच कलगीतुरा रंगला. उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी भाजपवर प्रखर टीका केली. चांगला हातातोंडाशी आलेला घास तिन पक्षाचं सरकार स्थापन झाल्यामुळे गेला आहे. मतदारांनीही पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत भाजपला नाकारलं. येत्या चार महिन्यात राजीनामे देऊन आमच्याकडे येतील कळणारही नाही, असं अजित पवार म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर पवारांनी केलेल्या टीकेला तेवढ्याच कडक शब्दात भाजप नेते निलेश राणेंनी ट्विटर च्या माध्यमातून पलटवार केला आहे.
कोणाला घ्यावा कोणाला न घ्यावा हा तुमचा प्रश्न आहे पण इतक्या पल्ट्या मारून सुद्धा मान वर करून फिरनारा माणूस मी पाहिला नाही. गप्प बसून ५ वर्षे उपमुख्यमंत्रिपद भोगलं असतं तर काही वाटलं नसतं. पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. राणेंनी कालही ट्विट करत राज्य सरकार आणि पवारांवर टीका केली होती.
दरम्यान, 3 पक्षाचे सरकार आले आणि हाता तोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय असं आज अजित पवार बोलले होते. अजित पवार तुम्ही पत्रकार परिषदेत रडता, मोबाईल बंद करून लपून बसता, बिन खात्याचे 3 महिने मंत्री राहण्याचा मान तुमचाच. तुम्ही इतके दुःखात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?, असा सवाल राणेंनी पवारांना केला होता.