शेतात काम करताना शॉक लागून ३८ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू…..!

केज दि. १६ – शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून जिवाचीवाडी (ता. केज) येथील एका ३८ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामकिशन उर्फ अण्णा लक्ष्मण चौरे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ही घटना मंगळवारी (दि. १५) रात्री घडली.
रामकिशन चौरे हे मंगळवारी रात्री आपल्या शेतात काम करत असताना त्यांचा अचानक एका विजेच्या वायरला स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार शॉक बसला. घटनेनंतर त्यांना तातडीने विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच जमादार उमेश आघाव यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची उत्तरीय तपासणी (पोस्टमार्टम) केल्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत रामकिशन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याच्या अशा अचानक जाण्याने जिवाचीवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार उमेश आघाव करत आहेत.