क्राइम
सुर्डी येथे तरुणास दगडाने मारहाण, तर शिरूर येथे पत्नीचे फुकारीने फोडले डोके……..!
केज दि.२१ – गॅरेजचे दुकान बंद का करत नाहीस असे म्हणत सहा जणांनी गॅरेज चालक तरुणास लाथाबुक्याने बेदम मारहाण करीत दगड डोक्यात मारून डोके फोडत जखमी केल्याची घटना केज तालुक्यातील सुर्डी येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सुर्डी येथील इसार साहेबलाल शेख ( वय २७ ) या तरुणाचे गॅरेज असून १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तो गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभा होता. याचवेळी रज्जाक शेख, सजात शेख, सोहज शेख, सलीम शेख, समीर शेख, शारूख शेख हे हातात दगडे घेऊन इसारकडे आले. त्यांनी तू तुझे गॅरेज बंद कर अन्यथा तुझ्या गॅरेजमध्ये गांजा ठेवून पोलिसांना कळवू असे म्हणत सलीम याने दगड गमजात गुंडाळून इसार याच्या डोक्यात मारून डोके फोडले. तर रज्जाक याने कॉलर पकडून इसार याला खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण केली. तर इतरांनीही लाथाबुक्याने मारहाण करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. इसार शेख याच्या फिर्यादीवरून वरील सहा जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत.
शिरूरघाट येथे पतीने पत्नीचे फुकारीने डोके फोडले
केज दि.२१ – बहिणीला घरी जेवणासाठी व झोपण्यासाठी का बोलावले नाहीस असे म्हणत पतीने शिवीगाळ करीत पत्नीच्या डोक्यात फुकारीने मारहाण करून डोके फोडल्याची घटना शिरूरघाट ( ता. केज ) येथे २० मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शिरूरघाट येथील सुनीता विक्रम सांगळे ( वय २२ ) या महिलेस एक पाच वर्षाचा व दुसरा तीन महिन्याचा अशी दोन मुले आहेत. तिचे पती विक्रम बळीराम सांगळे हे २० मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गावातून घरी आले. त्यांनी तु माझी मोठी बहीण रूक्मीण हीस तु आपल्या घरी जेवण्यासाठी व झोपण्यासाठी का बोलावले नाहीस असे म्हणुन पत्नी सुनीता हिस शिवीगाळ करू लागले. त्यावर सुनीता यांनी तुमची बहीण मावशीच्या घरी झोपते असे सांगितले. त्यानंतर चिडलेल्या विक्रम बळीराम सांगळे यांनी चुलीजवळ असलेली फुकारी उचलून पत्नी सुनीता हिच्या डोक्यात जोरात मारल्याने डोके फुटले. सुनीता सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे पती विक्रम सांगळे यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक बाळू सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.