आरोग्य व शिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिराची शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम…!

6 / 100 SEO Score
कळंब दि. २५ – शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या कळंब येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिराने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षा २०२५-२६ च्या निकालात शाळेच्या विद्यार्थ्यांनी मारलेली बाजी कौतुकास्पद ठरली आहे.
          शाळेतील इयत्ता चौथीतील चुणचुणीत विद्यार्थिनी कुमारी क्षितिजा कल्याण चौधरी हिने जिद्दीने अभ्यास करत शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळवून पात्र ठरण्याचा बहुमान मिळवला आहे. तर इयत्ता सातवीतून चिरंजीव बालाजी सांगळे याने आपल्या सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर शिष्यवृत्ती प्राप्त करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
       याचबरोबर केंब्रिज इंग्लिश स्कूलमधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी चिरंजीव दर्शील टेकाळे यानेही शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक  राहुल सोनवणे व  रवीकांत सोनवणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे हे यश म्हणजे त्यांची मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा सुंदर मिलाफ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर हे नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य देत आले असून, आगामी काळातही ही यशाची मालिका अशीच सुरू राहील.”
           विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक वैजनाथ चौधरी, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कठीण प्रश्नांची तयारी करून घेणे, सराव परीक्षा आयोजित करणे आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवणे यासाठी संपूर्ण स्टाफने घेतलेल्या मेहनतीचे आज चिमुकल्यांनी चीज करून दाखवले आहे.
            विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग तसेच शैक्षणिक वर्तुळातून कुमारी क्षितिजा चौधरी, चिरंजीव बालाजी सांगळे आणि चिरंजीव दर्शील टेकाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात असून त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी उज्वल शुभेच्छा दिल्या जात आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close