#Socialआपला जिल्हा
अंबाजोगाईत आज ‘भव्य अश्व रिंगण सोहळा’ आणि ‘वारकरी वेशभूषा दिंडी स्पर्धा’…..!

अंबाजोगाई दि. १५ – वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालय मैदानात ‘श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई पालखी सोहळ्याचे’ भव्य अश्व रिंगण आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १.०० वाजल्यापासून या धार्मिक सोहळ्यास सुरुवात होणार असून, यामध्ये हजारो भाविक सहभागी होणार आहेत.
वारकरी संप्रदायातील पहिले अभंग रचियता संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या पालखी सोहळ्याचे हे प्रतिवर्षीप्रमाणे होणारे भव्य आयोजन असून, या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभूषा दिंडी स्पर्धा
याच सोहळ्याच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘वारकरी वेशभूषा दिंडी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा चार गटांत विभागली गेली आहे:
१. पूर्व प्राथमिक (नर्सरी, LKG, UKG)
२. प्राथमिक (इयत्ता १ ली ते ४ थी)
३. उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी ते ७ वी)
४. माध्यमिक (इयत्ता ८ वी ते १० वी)
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजयी स्पर्धकांना आकर्षक रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ३,१०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २,००१ रुपये, तृतीय क्रमांकासाठी १,१०० रुपये आणि उत्तेजनार्थ ५०१ रुपयांचे बक्षीस (प्रत्येक गटासाठी) देण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे संयोजन भव्य अश्व रिंगण सोहळा संयोजन समितीद्वारे करण्यात आले असून, स्वागतध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्यासह समितीचे अध्यक्ष दिलीपदादा सांगळे, उपाध्यक्ष दिलीप गित्ते, बळीराम चोपणे, कार्याध्यक्ष बाबा महाराज जवळगावकर, समन्वयक अनंत अरसुडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
अंबाजोगाई परिसरातील सर्व भाविक आणि नागरिकांनी या भव्य सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.