#Social
वसंत प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी…..!

केज दि. २६ – स्थानिक वसंत प्राथमिक शाळा, वकीलवाडी (केज) येथे आषाढी एकादशीचा सण अतिशय उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक पेहराव परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमादरम्यान विठूमाऊलीच्या गजरात आणि विविध अभंगांच्या तालावर शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनमुराद ठेका धरला. मुख्याध्यापक प्रशांत देशमुख आणि शिक्षक विजय आरकडे यांनी हातात टाळ घेऊन विद्यार्थ्यांसोबत भजनावर ताल धरल्याने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.
दिंडी सोहळा व नगर प्रदक्षिणा
याप्रसंगी शाळेच्या वतीने वकीलवाडी परिसरात भव्य वारकरी दिंडी फेरी काढण्यात आली. चिमुकले विद्यार्थी पांढरा कुर्ता-पायजमा, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ आणि पताका घेऊन दिंडीत सहभागी झाले होते.
‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण वकीलवाडी परिसर दुमदुमून गेला होता. जणू काही प्रत्यक्ष पंढरपूरच वकीलवाडीत अवतरल्याचा भास होत होता. शाळेने जपलेल्या या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेबद्दल संस्थाचालक रमेश आडसकर यांनी सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच आपल्या संस्कृतीची व संस्कारांची आवड निर्माण व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. या सोहळ्यामुळे शाळा परिसर आणि वकीलवाडीतील नागरिक भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. पालक व ग्रामस्थांनीही या दिंडी सोहळ्याचे ठिकठिकाणी स्वागत केले.
दरम्यान, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना फलाहार वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी सहशिक्षक प्रवीण देशमुख, जयश्री गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.